लहान मुलांनी शिकवला मोठा धडा
दान, दया आणि दीनभावनेचा अनोखा संगम
औसा प्रतिनिधी
तौफीक सत्तार कुरैशी
रमजानचा पवित्र महिना म्हणजे इबादत, रहमत आणि नेकीचा संदेश देणारा काळ. याच पवित्र महिन्याच्या निमित्ताने औसा येथील ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलने ‘सदका बॉक्स’ हा उपक्रम राबवत लहान मुलांमध्ये दानशूरता, सहानुभूती आणि मानवतेची सुंदर जाणीव रुजवली.
या उपक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या-छोट्या बचतीतून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या या निरागस प्रयत्नातून “चांगल्या कामाची सुरुवात लहान असली तरी त्याचा परिणाम मोठा असतो” हा संदेश अधोरेखित झाला.
संपूर्ण रमजान महिन्यात मुलांनी सदका देत इबादतीसोबतच दुआंचा आदर राखला. तिन्ही आशुरांच्या दुआंमध्ये त्यांनी मनापासून सहभाग घेतला. तिसऱ्या आशुराच्या शेवटी सदका बॉक्स उघडण्यात आले असता, एकूण ₹११,१००/- इतकी रक्कम जमा झाल्याचे समोर आले.
या निधीतून औसा येथील तीन मदरसांना प्रत्येकी ₹१०००/- मदत देण्यात आली. तसेच गरजू कुटुंबांसाठी चार राशन किट, दोन शीरखुर्मा किट वितरित करण्यात आले आणि उर्वरित रक्कम गरजू विधवांना सहाय्य म्हणून देण्यात आली.
या प्रसंगी शाळेचे संचालक अॅड. इकबाल शेख, प्राचार्या अंजुमनेहा इकबाल शेख, पर्यवेक्षिका तहेनियत पठाण तसेच शिक्षिका तरन्नूम पटेल, सालेहा शेख, मुस्कान शेख, सानिया जमादार, आफरीन सिद्दीकी, आयेशा शेख, अल्फिया करपुडे, जरीना शेख, गुल्फशा काझी, शबनम सय्यद, उमर शेख, शेख सय्यदभाई उपस्थित होते. दरम्यान, रमजानच्या काळात विद्यार्थ्यांनी दीनविषयक ज्ञान वाढवण्यासाठी रमजान क्विझ स्पर्धा, भाषण स्पर्धा तसेच जंग-ए-बदर या ऐतिहासिक घटनेवर माहिती सादर केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, संस्कार आणि शिक्षणाबद्दलची आवड अधिक दृढ झाली.
खरंच, हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता, लहान मुलांच्या मनात मानवता, दयाळूपणा आणि समाजसेवेची बीजे रुजवणारा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरला आहे.
0 टिप्पणियाँ