गणेशोत्सवात डीजे बंदी – औसा पोलिसांची कारवाईला सुरुवात!

गणेशोत्सवात डीजे बंदी – औसा पोलिसांची कारवाईला सुरुवात!
 आवाजाच्या नमुन्यांचे पंचनामा; डीजे चालकांना प्रशासनाचा इशारा

औसा :प्रतिनिधि 

महाराष्ट्र शासनाने यंदाच्या गणेशोत्सवाला राज्योत्सव घोषित करून राज्यभरात डीजे वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी औसा पोलिस प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाईपूर्व आवाजाचे नमुने घेत पंचनामा केला असून, येणाऱ्या मिरवणुकीदरम्यान नियमभंग झाल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा लोकउत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम व धार्मिक सोहळे पार पडतात. मात्र, गेल्या काही वर्षांत डीजे व डॉल्बीमुळे ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्याला व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला याचा त्रास होत असल्याने शासनाने यंदा ही कडक पावले उचलली आहेत.

औसा शहरात पोलिसांनी रस्त्यावरच डीजे मोजणी यंत्राद्वारे आवाजाचे नमुने तपासले. संबंधित पंचनाम्यातून डीजे चालकांना इशारा देण्यात आला की, मिरवणुकीदरम्यान कुठेही डीजे किंवा डॉल्बीचा वापर केल्यास कठोर कायदेशीर कारवाई होईल. त्याऐवजी पारंपरिक ढोल, ताशा, झांज, लेझीम यासारख्या वाद्यांचा वापर करून लोकांचा सहभाग वाढवावा असे पोलिस प्रशासनाने आवाहन केले आहे.

शासनाने उत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्यामुळे “सांस्कृतिक परंपरा जपत, प्रदूषणमुक्त व आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करा” असा संदेशही देण्यात आला आहे. नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून उत्सव साजरा केल्यास कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. मात्र नियमभंग करणाऱ्यांना सूट दिली जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ