एक कोटींच्या इन्शुरन्ससाठी दुसऱ्याचा जाळून खून; स्वतः मृत असल्याचा बनाव उघड

एक कोटींच्या इन्शुरन्ससाठी दुसऱ्याचा जाळून खून; स्वतः मृत असल्याचा बनाव उघड

 लातूर पोलिसांची मोठी कामगिरी : अवघ्या 24 तासांत आरोपी जेरबंद

मुख्य संपादक
तौफीक सत्तार कुरैशी 

एक कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सचा लाभ मिळवण्यासाठी व सुमारे 57 लाख रुपयांचे कर्ज माफ व्हावे, यासाठी दुसऱ्या निष्पाप व्यक्तीचा जाळून खून करून स्वतः मृत असल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीस लातूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक करून अत्यंत धक्कादायक गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

ही घटना औसा पोलीस ठाणे हद्दीत वानवडा पाटी ते वानवडा रोडवर अगरवाल यांच्या शेताजवळ घडली. याप्रकरणी गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गु.र.नं. 521/2025 कलम 103(1), 238 बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 जळालेली कार आणि अर्धवट जळालेला सांगाडा
दि. 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12.30 वाजता डायल 112 वरून वानवडा रोडवर कार जळत असल्याची माहिती मिळताच औसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला. प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला.

कार क्रमांक MH-43-AB-4200 वरून तपास केला असता वाहन गणेश चव्हाण वापरत असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांनी सांगाड्याची ओळख गणेश चव्हाण अशी केल्याने मृतदेह तात्पुरत्या अटीवर त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

 संशय, तांत्रिक विश्लेषण आणि मोठा खुलासा

मात्र तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलिसांना गणेश चव्हाण जिवंत असल्याचा संशय आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता तो विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे लपल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले.

 थंड डोक्याने आखलेला कट

पोलिस चौकशीत आरोपीने कबुली दिली की तो आर्थिक अडचणीत असून त्याने एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला होता. कर्ज फेडण्यासाठी व इन्शुरन्सचा लाभ कुटुंबाला मिळावा, यासाठी त्याने हा कट रचला.

दि. 13 डिसेंबर रोजी रात्री त्याने दारूच्या नशेत असलेल्या गोविंद किशन यादव (वय 50, रा. पाटील गल्ली, औसा) यास लिफ्ट देऊन निर्जनस्थळी नेले. झोपलेल्या अवस्थेत त्यास ड्रायव्हर सीटवर बसवून कार पेटवून दिली आणि स्वतः फरार झाला.

 पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

हा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केला. अवघ्या 24 तासांत हा अत्यंत गुंतागुंतीचा कट उघडकीस आणल्याने लातूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ